
म. टा. वृत्तसेवा, वसई
वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामध्ये पालिकेने अद्ययावत सेमी-ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि मोफत आरोग्य सेवेचा शुभारंभ केला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेने तामतलाव येथे अद्ययावत सेमी-ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उभारला आहे. या जलतरण तलावाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या जलतरण तलावासाठी ४.५० कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये जलतरण तलाव, बेबी जलतरण तलाव, इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादी कामांचा समावेश आहे. तसेच, यांसह वसई-विरार शहर महानगरपालिकेस श्वेतांबर स्थानिक जैन संघाने आरोग्य केंद्रासाठी माणिकपूर वसई येथे सुमारे १२०० चौ. फूट जागा महापालिकेस आरोग्य केंद्रासाठी दिली होती. या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मोफत आरोग्य सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी रुग्णासाठी पूर्णवेळ फिजीशियन, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. महानगरपालिकेच्या या सुविधांमुळे नवघर माणिकपूर परिसरातील गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. या उद्घाटनानंतर समाज उन्नत्ती मंडळ येथे कार्यक्रम झाला. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.